महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गोवेश्वर देवस्थानातील उपक्रम प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशा देणाराः मंगेश चिवटे

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गोवेश्वर देवस्थानातील उपक्रम प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशा देणाराः मंगेश चिवटे

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गोवेश्वर देवस्थान येथे पार पडलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक जाणीवेचा दीपस्तंभ ठरला. रामानंदाचार्य दक्षिणपीठ उपपीठ या पवित्र स्थळी आयोजित या सोहळ्यास उपस्थित राहून परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांची भेट घेण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद लाभण्याचा सुअवसर मिळाला.
या भेटीदरम्यान महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या व्यापक आणि सेवाभावी आरोग्यकार्याची सविस्तर माहिती घेता आली. अध्यात्मासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर उभा केला आहे. केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल १ लक्ष ४० हजार रक्त बाटल्यांचे संकलन ही कामगिरी साध्य झाली आहे, हे त्यांच्या सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. रक्तदानातून हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या प्रेरणेने घडत आहे.
याचबरोबर १७७ भक्तांनी देहदानाचा संकल्प केला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी ही मोठी देणगी ठरत आहे. विशेष म्हणजे स्वतः परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांनी अवयदानाचा फॉर्म भरून समाजापुढे अनुकरणीय आदर्श ठेवला आहे. त्यांच्या प्रेरणेने १ लक्षाहून अधिक भक्तांनी अवयदानाचे फॉर्म भरले असून, ही चळवळ मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारी ठरत आहे.
धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर मानवतेची सेवा हाच खरा धर्म—हा संदेश महाराजांच्या कार्यातून प्रकर्षाने उमटतो. अध्यात्म, सेवा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. महाशिवरात्रीच्या या मंगल प्रसंगी अनुभवलेला हा सोहळा मनाला अंतर्मुख करणारा, प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशा देणारा ठरला.
Previous मंगेश चिवटे यांची फार्मा, हेल्थ केअर अँड वेलनेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -